देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना भास्कर जाधवांचे उत्तर


मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यू प्रकरणावरुन आज विधानसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला.

हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपने सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही लावून धरली. सभागृहात त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. पण गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप केला. तसेच वाझेंनी यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणल्याचे दु:ख झाल्याचा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर शिवसेनेचा आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन फडणवीस यांच्यावर टीका केली. अन्वय नाईक व त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून २०१८ मध्ये आत्महत्या केली. तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले.

त्यानंतर हे प्रकरण या सरकारकडे आले, अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की, माझ्या नवऱ्याने व सासुने आत्महत्या केलेली आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलेले आहे, असे त्यांनी सांगितले आणि गृहमंत्र्यांनी त्याची चौकशी सुरू केली. सचिन वाझे ती चौकशी करत होते. ही चौकशी सचिन वाझेंकडे राहू नये, ही जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील. म्हणून सचिन वाझेला टार्गेट केले जात असल्याचे जाधव म्हणाले. तसेच सचिन वाझेंना अजिबात काढायचे नाही, यांचीच चौकशी होईल म्हणून हे वाझेंना काढण्याची मागणी करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

जाधव यांनी पुढे बोलताना, सचिन वाझेंनी यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला घरातून उचलून आणले म्हणून यांना दु:ख झालेले आहे. त्याचबरोबर जस्टीस लोढा यांची हत्या झाली. ती नागपूरमध्ये झाली. ती हत्या का झाली हे सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. सचिन वाझे हा जर तपास अधिकारी राहिला तर यांचे बिंग फुटेल. यांना बेड्या पडतील. म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकारने सचिन वाझे यांना त्यांच्या पदावर कायम ठेवावे, अशी मागणी केली.

भास्कर जाधवांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. भास्कर जाधव यांना हे माहिती नाही. भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, धमक्यांना घाबरणारी आम्ही लोक नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. पण सचिन वाझेवर कारवाई का नाही?, असा प्रश्न उपस्थित केला.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तक्रार त्यांची पत्नी यशदा नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले, असे म्हणत जाधवांच्या वक्तव्याचे समर्थन केले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्येचे प्रकरण दाबले. आम्हाला त्याची चौकशी करायची असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. माझं खुले आव्हान आहे की माझी चौकशी करा. कर नाही त्याला डर कशाची. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असल्याचे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले. सभागृहातील प्रचंड गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते.