वाझेंना सरकार का पाठिशी घालत आहे? – देवेंद्र फडणवीस


मुंबई – गृहमंत्र्यांनी अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत वाझेंना हटवण्याचे कबूल केले, पण नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर निर्णय बदलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला. सचिन वाझेंना सरकार का पाठिशी घालत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आज(मंगळवारी) विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

फडणवीस यांनी यावेळी सचिन वाझे यांना अटक झाली तर सरकारमधील कोणा कोणाची नावे समोर येतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सचिन वाझेला पाठिशी घालत असून सभागृहापेक्षा हा अधिकारी मोठा का? असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच, विरोधी पक्षनेत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात, पण आम्ही घाबरणाऱ्यातले नाही व सत्य बाहेर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे देखील फडणवीस म्हणाले. मनसुख हिरेन यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब मी आज सभागृहात वाचून दाखवला. ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत.

स्फोटके ठेवून मनसुख हिरेन यांची जी गाडी घटनेकरिता वापरण्यात आली होती. ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असे स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्याचबरोबर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि तीन दिवस रोज ते सचिन वाझेसोबत सकाळी जायचे व रात्री यायचे, हे देखील त्यांच्या पत्नीने सांगितल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी माध्यमांना दिली.