आज मध्यरात्रीनंतर नाशिक जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू


नाशिक – गेल्या महिन्यापासून शहरासह जिल्हाभरात वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे अखेर प्रशासनाने कोरोना प्रतिबंधाचे निर्बंध कडक करत त्यामध्ये वाढ केली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच जीवनाव‌श्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, मेडिकल वगळता इतर बाबी या सुरू ठेवण्याची परवानगी दिली असून, हे सर्व निर्बंध मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी जाहीर केले. कुठलेही निर्बंध वृत्तपत्रांवर लादले नसून त्यांचे नियमित वितरणही सुरू राहणार आहे.

नाशिकमध्ये एकाच महिन्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत चारपट वाढ झाली आहे. सातत्याने नागरिकांना आवाहन करून देखील नियमांचे पालन होताना दिसत नाही. तसेच बाजारपेठांमधील गर्दीदेखील कमी होत नसल्यामुळे आणि वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. ८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सायंकाळी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यात निष्ठूर न होता निर्बंध कडक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. बार, परमिट रूम, हॉटेल्स, मद्य दुकानांची वेळ एक तासाने कमी करत ते १० ऐवजी आता रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.

मनपा आयुक्तांनी यापूर्वीच नाशिक शहरातील शाळा या बंद केल्या असून मालेगाव, नाशिक, निफाड आणि नांदगाव या चार तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग अधिक असल्यामुळे येथील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहतील. दहावी व बारावीचे वर्ग हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक राहणार असून, महाविद्यालयांनाही वर्ग ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे चार तालुके वगळता इतर तालुक्यांतील शाळा मात्र सुरू राहतील.

नाशिकमध्ये अशा प्रकारे आहेत निर्बंध

  • सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर बाबींना परवानगी
  • नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाडमधील शाळा पूर्णपणे बंद.
  • पालकांच्या संमतीनुसार दहावी-बारावी शाळा सुरू राहतील. ऑनलाइन सुरू ठेवल्यास उत्तम.
  • केवळ व्यक्तिगत वापरासाठी सरावापुरतेच जिम, मैदाने, स्वीमिंग टँक सुरू राहणार. स्पर्धा, गर्दीवर बंदी.
  • हॉटेल, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या कर्मचारी क्षमतेने राहतील सुरू.
  • पार्सल सेवा रात्री १० पर्यंत.
  • १५ मार्चनंतर लग्न सोहळ्यांना बंदी.
  • धार्मिक सोहळे, सामाजिक समारंभ, राजकीय सभांवर बंदी.
  • एमपीएससी आणि यूपीएससीच्या तसेच प्रस्तावित परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार.
  • जिल्ह्यात नाशिक आणि मालेगावमध्ये खासगी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद.
  • शनिवार, रविवार धार्मिकस्थळे राहणार बंद. इतर दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली.
  • सर्व आठवडे बाजार बंद
  • बाजार समित्या ५० टक्के क्षमतेने
  • आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई