अर्जुन कपूर आणि परिणीतीच्या ‘संदीप और पिंकी फरार’चा ट्रेलर रिलीज


पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी येत आहे. 2012 साली परिणीती आणि अर्जुन या दोघांनी ‘इश्कजादे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. त्यानंतर ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात दोघांची जोडी झळकली. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात परिणीती आणि अर्जुन यांची जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

येत्या 19 मार्चला चित्रपटगृहात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट रिलीज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मोठा सस्पेंस पाहायला मिळत आहे. टिपीकल लव्हस्टोरी या चित्रपटात नसून एक वेगळाच थरार पाहायला मिळणार हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येत आहे. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर परिणीती चोप्राला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. तर ट्रेलरच्या शेवटामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे.


अर्जुन कपूर या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेचे नावं पिंकी आहे तर परिणीती करिअरवर प्रेम असणाऱ्या तरुणीची भूमिका साकारत आहे. तिचे या चित्रपटात नाव संदीप कौर आहे. चित्रपटाच्या आणि भूमिकांच्या हटके नावांप्रमाणेच चित्रपटाचे कथानकही वेगळे असणार आहे. सस्पेंससोबतच ब्लॅक कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्येच रिलीज होणार होता. यावेळी चित्रपटाचा पहिला टीझरही रिलीज करण्यात आला होता. पण कोरोना आणि लॉकडाउनच्या विळख्यात चित्रपटाचे प्रदर्शन रखडले. अखेर एक वर्षाने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त लागला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे.