अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचा 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत समावेश


नवी दिल्ली – 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा समावेश करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 25 महिलांची यादी फेम इंडिया आणि आशिया पोस्टच्या सर्वेक्षणानुसार जाहीर करण्यात आली आहे.

भारतात हे सर्वेक्षण महिला सबलीकरण, सामाजिक स्थिती, संसदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध 10 निकषांवर करण्यात आले होते. जेमतेम 18 महिने नवनीत राणा यांच्या खासदारकीला पूर्ण झाले आहेत. पण त्यांचा या कालावधीत संसदेत झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये सहभाग होता. महिलांसह महाराष्ट्राचे मुद्दे मांडणाऱ्या महाराष्ट्राच्या खासदारांमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेखनीय सहभाग असतो. महाराष्ट्रातील महिला खासदारांचा विचार केला तर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि नवनीत राणा आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात.

नवनीत राणा या 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढल्या. त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. पण नवनीत राणा यांनी विजयानंतर अनेकदा महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भूमिका मांडल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुकही करताना त्या दिसतात. त्यामुळे अनेकदा त्या वादातही सापडतात.

नवनीत राणा यांनी 2014मध्येही लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईत राहणाऱ्या नवनीत राणा लग्नानंतर आपले पती रवी राणा यांच्यासोबत अमरावतीत राहू लागल्या आणि पुढे जाऊन त्यांनी त्याच मतदारसंघाचे नेतृत्व करायला सुरूवात केली.