आठ मार्च रोजी का साजरा केला जातो जागतिक महिला दिन ?

woman-day
आंतरराष्ट्रीय महिला दिन दर वर्षी आठ मार्च रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. पण मुळात महिला दिनाची सुरुवात झाली कशी? तर हा दिवस एका कामगार आंदोलनाचा परिणाम म्हणता येऊ शकेल. याची सुरुवात १९०८ साली न्यूयॉर्क शहरामध्ये झाली. १९०८ साली न्यूयॉर्क मध्ये पंधरा हजार महिलांनी कामाचे तास कमी करून मिळावेत ही मागणी पूर्ण करविण्यासाठी मोर्चा काढला होता. त्याचबरोबर त्या करीत असलेल्या कामाचा त्यांना योग्य मोबदला दिला जावा आणि मतदानाचा हक्कही दिला जावा अशी या महिलांची मागणी होती. हे आंदोलन यशस्वी होऊन महिलांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर अमेरिकन सोशलिस्ट पार्टीने हा दिवस ‘महिला दिन’ म्हणून घोषित केला.

हा महिला दिन जागतिक पातळीवर साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम क्लारा जेटकिन्स यांनी १९१० साली कोपनहेगन येथे व्यावसायिक महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये प्रथम मांडली. या परिसंवादासाठी एकूण सतरा देशांमधील शंभर महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांनी जागतिक महिला दिनाच्या कल्पनेला समर्थन दिल्यानंतर १९११ सालामध्ये डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये जागतिक महिला दिन सर्वप्रथम साजरा करण्यात आला. १९७५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला औपचारिकरित्या मान्यता दिल्यानंतर ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर’ अशी जागतिक महिला दिनानिमित्त पहिली थीम होती.
woman-day1
क्लारा जेटकिन्सने जेव्हा जागतिक महिला दिनाची कल्पना मांडली, तेव्हा हा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जावा हे निश्चित केलेले नव्हते. ज्या दिवशी महिलांनी मतदानाचा हक्क मागितला आणि त्यासाठी आंदोलन केले तो दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे आठ मार्चचा होता, म्हणून त्या तारखेची निवड जागतिक महिला दिन म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही साजरा केला जात असून १९ नोव्हेंबररोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. १९९० सालापासून हा दिवस साठहूनही अधिक देशांमध्ये साजरा केला जात असला, तरी अद्याप या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यता मिळालेली नाही.

Leave a Comment