आतापर्यंत देशातील एक कोटी 90 लाख नागरिकांना देण्यात आली कोरोना लस


नवी दिल्ली: एक मार्च पासून देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत देशातील एक कोटी 90 लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

16 जानेवारीपासून देशात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कस यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात आली. आता कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरु झाला असून त्यामध्ये 60 वर्षापरील नागरिक आणि ज्या लोकांना गंभीर असे आजार आहेत अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. 5 मार्चच्या संध्याकाळपर्यंत देशात एक कोटी 90 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

याआधी गुरुवारी देशात सर्वात जास्त कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 40 टक्के अधिक लसी देण्यात आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. भारत आता कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत जगात दुसऱ्या नंबरवर असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. आता भारतात कोरोनाचा दुसरा डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत अमेरिका, भारत या देशांनंतर ब्रिटन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 60 वर्षावरील आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील 60,17,862 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 3,13,226 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी एकूण 10,34,672 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून त्यामध्ये 8,25,537 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंद करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. लोकांनी सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचेही पहायला मिळाले.

एखादी व्यक्ती लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. आपण त्याआधारे आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.