संजय राऊत यांची मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पहिली प्रतिक्रिया


मुंबई – प्रसिद्ध उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मागील महिन्यात स्फोटकांचा साठा असलेली गाडी सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीजवळ आढळून आल्यामुळे प्रकरणाचे गूढ आता वाढले आहे. पोलीस मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे सांगत असताना हिरेन कुटुंबिय हा दावा फेटाळत आहेत. यादरम्यान या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

उपस्थित केलेले प्रश्न जर योग्य, मुद्देसूद असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. लवकरात लवकर ती शंका दूर होणे गरजेचे आहे. त्यांच्या मृत्यूचे भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्यांचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचे सत्य जेवढ्या लवकर गृहखाते समोर आणेल तितके हे या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू अधिवेशन सुरु असताना होणे हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही व्यथित करत असेल. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणे गरजेचे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास देण्याची जी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येईल, असे नाही. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे दिला आहे. त्यातील सर्व अधिकारी उत्तम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. २००८ मध्ये सचिन वझे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संशय निर्माण झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, मला तसे वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणे योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचे नाव घेऊन असे बोलणे मला योग्य वाटत नाही.