दहशतवाद विरोधी पथक करणार मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास


मुंबई : मागील महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. धमकीचे पत्र घराबाहेरील गाडीत सापडले असून अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी यामध्ये देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता धमकीचा देखील तपास एटीएसकडे देण्यात आला आहे.

आपल्या जबाबात मनसुख हिरेन यांनी म्हटले होते की, ती गाडी मी घरगुती वापराकरता विकत घेतली. त्याचे स्टेअरिंग जॅम झाल्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. या प्रकरणातला जो दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत, असे कोणी आत्महत्या करत नाही. एवढे योगायोग होत नाहीत. हे प्रकरण तात्काळ एनआयएकडे दिले पाहिजे, असे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचे सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणात एनआयए चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत फडणवीस यांनी केली होती. महाराष्ट्र पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम असल्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ‘एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले होते.