पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक

belly
एखाद्याच्या शारीरिक स्वास्थ्याचा अंदाज शरीराच्या सुदृढतेवरून लावला जातो. त्यामुळे बळकट आणि ‘टोन्ड’ स्नायू, उत्तम स्टॅमिना आणि अर्थातच न सुटलेले पोट यावरून एखाद्याच्या स्वास्थ्याचा अंदाज लावता येऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने शरीर सुदृढ आणि सुडौल होत असतानाच पोटावर असलेली चरबी कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. पोटावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांमध्ये याबद्दल अनेक गैरसमजही पहावयास मिळतात. हे गैरसमज कोणते आणि यामध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेऊ या.
belly1
व्यायामामध्ये खास पोटावरील चरबी कमी करण्यासाठी केवळ ‘क्रन्चेस’ केल्याने पोटावरील चरबी कमी होते हा गैरसमज अनेकांच्या मनामध्ये पाहता येतो. क्रन्चेस हा व्यायामप्रकार पोटावरील चरबी घटविण्यास सहायक असला, तरी केवळ यांच्यामुळे पोटाचा घेर कमी होतो असे मात्र नाही. क्रन्चेस करून पोटावरील चरबी कमी करतानाच, सर्व शरीरावरील चरबी कमी होईल अश्या प्रकारचा व्यायाम केला जावा. त्यामुळे आपल्या व्यायामामध्ये ‘स्ट्रेंग्थ ट्रेनिंग’ आणि ‘ हाय इंटेन्सिटी कार्डियो’ सारख्या व्यायामप्रकारांचाही समावेश असावा.
belly2
कित्येकदा केवळ ग्रीन टीच्या सेवनाने पोटावरील चरबी घटण्यास मदत होत असल्याचा समजही अनेकांच्या मनामध्ये दिसून येतो. ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक मात्रेमध्ये असल्याचे जरी खरे असले, तरी केवळ ग्रीन टी प्यायल्यानेच पोटावरील चरबी कमी होते असे समजणे चुकीचे आहे. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टीच्या जोडीनेच संतुलित, पौष्टिक आहार, आणि योग्य व्यायामाची ही आवश्यकता असते. नियमित व्यायाम केल्याने आपल्या मनाला येईल ते आपण खाऊ-पिऊ शकतो अशी समजूत वजन आणि अर्थातच पोटावरील चरबी वाढण्यास कारणीभूत ठरत असते. योग्य आहार आणि नियमित व्यायाम हे एकमेकांना पूरक असून, यांच्यामधील योग्य संतुलन साधता आल्यानेच पोटावरील चरबी घटविता येणे शक्य होत असते.
belly3
बाजारामध्ये उपलब्ध असलेले तथाकथित ‘लो फॅट’, पॅकेज्ड अन्नपदार्थ वजन घटविण्यासाठी चांगला पर्याय असल्याचेही अनेक लोक मानतात. पण वास्तविक आहारामध्ये इतर सर्व पोषक तत्वांच्या सोबत स्निग्ध पदार्थ देखील आवश्यक असतात. त्यामुळे आहारातून शरीराला ‘गुड फॅट्स’ मिळतील असे अन्नपदार्थ आपल्या आहाराध्ये समविष्ट असायला हवेत. शरीराला चांगले असे स्निग्ध पदार्थ आहारातून घेतले गेल्याने भूक लवकर शमण्यास मदत होत असते. त्यामुळे सातत्याने ‘लो-फॅट’ पदार्थांच्या सेवनाने शरीराला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. आपल्या आहारामध्ये तूप, चांगल्या प्रतीची खाद्यतेले यांचा समावेश अवश्य असावा.

कमी खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होते असा ही एक गैरसमज आढळून येत असतो. भोजन घेताना आपण किती खात आहोत याकडे लक्ष असणे अगत्याचे असले तरी तरी आपली भूक मारणे किंवा नावापुरते काहीतरी खाऊन अधिक काळ स्वतःच्ला उपाशी ठेवणे याचे अपायच अधिक आहेत. आपल्या शरीराला आवश्यक तितका आहार त्याला मिळाला नाही, तर शरीराची चयापचय शक्ती कमी होते, आणि त्यामुळे वजन घटण्याची प्रकिया ही मंदावते. त्यामुळे माफक आहाराद्वारे शरीराला आवश्यक इतकी कर्बोदके, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे आणि अन्य पोषक तत्वे मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. या कामी गरज भासल्यास आहारतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment