नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार ममता बॅनर्जी


कोलकाता – विधानसभा निवडणुकीसाठी २९१ उमेदवारांची यादी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीमधून टीएमसीने २० आमदारांची नावे वगळली असून यामध्ये काही पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही मोठ्या नंत्यांचा समावेश आहे. यादीतून ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. दरम्यान ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

२९४ पैकी तीन जागा मित्रपक्षांसाठी उत्तर बंगाल आणि इतर ठिकाणच्या सोडल्या असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. यादी जाहीर करताना ममता बॅनर्जी यांनी, यामध्ये एकूण ५० महिला उमेदवार, ४२ मुस्लिम उमेदवार, ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे. यादी जाहीर करतच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहेत.

दरम्यान शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार की नाही? हे जाणून घेण्याबद्दल असंख्य लोकांमध्ये उत्सुकता असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर याठिकाणी माहिती देत आहे. सध्याची पश्चिम बंगालमधील परिस्थिती बघितली तर असे दिसत आहे की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरले जात असल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे की, पश्चिम बंगालची निवडणूक शिवसेना लढणार नाही, पण ममतांना समर्थन असेल. आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत, यावर आमचा विश्वास असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.