एनसीबीचे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आरोपपत्र दाखल, रियासह 33 जणांचा आरोपपत्रात समावेश


मुंबई : एनसीबीने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील चार्जशीट दाखल केली आहे. 33 जणांचा एनसीबीच्या चार्जशीटमध्ये समावेश आहे. एनसीबीने या चार्जशीटमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 30 हजार पानी आरोपपत्र एनसीबीच्यावतीने दाखल करण्यात आले आहे. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जणांची चार्जशीटमध्ये नावे आहे. तर दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींचा जबाबाचा समावेश आहे. त्यांचा आरोपपत्रात आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही.

14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत हा नैराश्यात असल्याची माहिती सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. सुशांतच्या घरी पोलिसांना काही औषधे मिळाली त्यावरुन हा अंदाज लावण्यात आलेला आहे. पण आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या घरात सुसाइड नोट सापडलेली नाही.