‘रिअलमी’च्या सीईओंवर ‘शाओमी’ने केला खोटे बोलण्याचा आरोप


नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शाओमी आणि रिअलमी या दोन्ही चीनच्या कंपन्या चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. दोन्ही कंपन्यांचा नेहमीच एकमेकांच्या प्रोडक्ट्सला टक्कर देण्याचा प्रयत्न असतो. पण, आता एका मोबाईल फिचरवरुन दोन्ही कंपन्या एकमेकांना लक्ष्य करत आहेत.

एक ट्विट रिअलमीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांनी केले होते. त्यांनी त्यामध्ये 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा देणारी रिअलमी ही पहिली कंपनी असल्याचे नमूद केले. त्यांनी हे ट्विट रिअलमी XT स्मार्टफोनबाबत माहिती देताना केले होते. त्यावर लगेचच शाओमीच्या सब-ब्रँड डायरेक्टर स्नेहा ताईनवाला यांनी माधव सेठ यांना टॅग करत रिप्लाय दिला आणि माधव सेठ यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला.

स्नेहा यांनी माधव यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत माधव सेठ यांना टॅग केले, माधव सर, तुमचा पूर्ण आदर ठेवते, पण कृपया खोटे बोलून ग्राहकांची दिशाभूल करु नका. जगातला पहिला 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेला फोन रेडमी नोट ८ प्रो होता आणि तो फोन आम्ही ऑगस्ट २०१९ मध्ये लाँच केला होता. आतातरी तुम्ही खोटे बोलणार नाही, अशी अपेक्षा ठेवते, असे ट्विट केले. दरम्यान, शाओमी आणि रिअलमी या दोन्ही चिनी कंपन्या असून भारतीय मार्केटमध्ये सध्या या दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.