PF चे व्याजदर जैसे थे, सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा


नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) केली आहे. व्याजदर ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने केली आहे. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ईपीएफओच्या निधीवर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्येही ८.५० टक्के व्याज देण्यात येत होते.

आर्थिक वर्ष २०१९-२० मधील वार्षिक ८.५० टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कोरोना तसेच लॉकडाउनमुळे आर्थिक चणचणीतील संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे तसेच कमी योगदान देण्याचे धोरण अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याच्या चर्चा होत्या. पण आजच्या निर्णयावरुन या सर्व चर्चा चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईपीएफओचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील आर्थिक वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते. यंदा हा दर ८.५० टक्के राहणार असून कोरोना आणि लॉकडाउननंतरही यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयाची घोषणा श्रीनगरमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर करण्यात आली.