गृहमंत्र्यांची जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी पोलिसांना क्लीन चिट


मुंबई – जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. यावेळी महिलांचे वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचे सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

काही सांस्कृतिक कार्यक्रम वसतिगृहात ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले, महिलांशी चर्चा केली. महिलांचे वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नसल्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून, तो मी पटलावर ठेवतो, असं अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यानंतर कोरोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्याला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, १७ महिलांना कविता म्हणण्याचे, गाणी गाण्याचे बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला उपस्थित होत्या. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाच्या खालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का ? अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी हे वृत्त चुकीचे असून हे मुलींचे नाही तर महिलांचे वसतिगृह असल्याची माहिती दिली. तसेच ही बातमी ज्या वृत्तपत्राने दिली आहे त्यांच्यावर कारवाई करु, असेही त्यांनी सांगितले.