केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन


नवी दिल्ली – केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले व मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ई श्रीधरन हे केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमच्या पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती केरळमधील एमओएस एमईए व भाजप नेते व्ही मुरलीधरन यांनी दिली आहे.

भाजपची सत्ता केरळमध्ये आणणे हे आपले मुख्य उद्दीष्ट असून राज्यात पक्षाने यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन, असे श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करण्याअगोदरच म्हणाले होते. तसेच, केरळमध्ये या वर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे देखील श्रीधरन यांनी सांगितले होते. श्रीधरन यांनी पीटीआयशी बोलताना पक्षाने ठरवल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यास आणि त्यानंतर पक्ष विजयी झाल्यास मुख्यमंत्री पद सांभाळण्यासही तयार असल्याचे म्हटले होते.