ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता


नवी दिल्ली – ओटीटी म्हणजेच ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पॉर्नोग्राफी काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचेही स्क्रीनिंग होणे गरजेचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली सर्वोच्च न्यायालय पाहणार असून त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटसंदर्भात चिंता व्यक्त करणारे वक्तव्य केले आहे. अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात अ‍ॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ या वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

आज न्यायालयामध्ये अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचीही स्क्रीनिंग झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. म्हणजेच ज्याप्रमाणे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड तो पाहून त्यामधील बदल सुचवते, तसे ओटीटीवरील कंटेंटसाठीही अशाप्रकारचे प्रदर्शानापूर्वीच स्क्रीनिंग झाले पाहिजे. हा कंटेट दाखवण्यासंदर्भातील परवानगी मिळाल्यानंतर तो दाखवण्यात आला पाहिजे, असे न्यायमूर्तींना सूचित करायचे होते.

मुकुल रोहतगी यांनी अपर्णा पुरोहित यांच्याकडून बाजू मांडताना न्यायालयाला, ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील नियम नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणामधील अर्जदार या केवळ अ‍ॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. ज्यांनी ही सीरियल बनवली आहे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्याविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची भूमिका मांडली. न्या. भूषण यांनी याच भूमिकेवर भाष्य करताना आजकाल ज्या गोष्टी ओटीटीवर दाखवल्या जातात त्यामध्ये कधी कधी पॉर्नोग्राफीही असल्याचे मत नोंदवले. न्या. भूषण यांनी केलेले हे वक्तव्य तांडव या वेब सीरीजसंदर्भात नव्हते तर ते सर्वसामान्यपणे वेब सीरीजसाठी देखील होते.

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती न्यायालयाला देतानाच अपर्णा यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी अद्याप नियम बनवण्यात आलेले नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच आम्हाला या नियमावलीची काहीही अडचण नसून ही नियमावली येण्याआधी तांडव तयार करण्यात आल्याचेही रोहतगी म्हणाले. मात्र वेळ कमी असल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट केले.