बंगळुरु – कर्नाटकमध्ये भाजपच्या बी एस येडियुरप्पा यांच्या सरकारमधील जलसंवर्धन मंत्री रमेश जारकीहोली आणि एका अज्ञात महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनेक दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ दाखवला जात आहे. आता समाजसेवक असणाऱ्या दिनेश कालाहल्ली यांनी याच प्रकरणी बंगळुरुमधील कब्बन पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. व्हायरल व्हिडीओमधील मंत्री नोकरी देण्याच्या नावाखाली महिलेचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारमधील जलसंवर्धन मंत्री अडकले Sex CD प्रकरणात
या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या कोणतीही तक्रार दाखल करुन घेतलेली नसल्याचे द इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. याबाबत पोलीस उपायुक्त एम. एन. अनुचेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सध्या मिळालेल्या तक्रारीमध्ये किती सत्यता आहे हे तपासून पाहत आहे. या प्रकरणासंदर्भात आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत एक बैठकही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. रमेश यांची या प्रकरणामध्ये बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा मागितला जावा यावर या बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्राथमिक शिक्षण मंत्री सुरे कुमार यांनी, यासंदर्भातील निर्णय पक्षातील नेते घेतील, असे म्हटले आहे.
या प्रकरणावर भाजपच्या अनेक मंत्र्यांनी मौन बाळगले आहे. ज्या रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनीही यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. आपला फोन रमेश यांनी बंद ठेवला आहे. सत्तेत असणाऱ्या भाजपच्या येडियुरप्पा सरकारमधील ६० वर्षीय रमेश हे महत्वाचे मंत्री आहेत. रमेश हे कर्नाटकातील बेळगावमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपला काँग्रेसचे १७ आमदार फोडण्यामध्ये मदत केली होती. याच घटनेनंतर भाजपला राज्यात सरकार बनवता आले आणि जुलै २०१९ मध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आले.