कायदेशीरदृष्ट्या अद्यापही संजय राठोड वनमंत्री पदावर कायम


मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणी राजीनामा दिला होता. पण अद्याप राज्यपालांकडे संजय राठोड यांचा राजीनामा पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. संजय राठोड यांचा राजीनामा तीन दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे संजय राठोड अद्यापही तांत्रिकदृष्ट्या वनमंत्री पदावर कायम आहेत.

संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचे म्हणणे असे होते की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. पण संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. याचा अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली होती. संजय राठोड आपले मंत्रिपद टिकावे म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.