जाणून घ्या कोणी घेऊ नये ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’?, लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय कराल?


नवी दिल्ली – एक मार्चपासून देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत या टप्प्यामध्ये मोफत लस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केलं आहे. त्यानुसार लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली.

पण लसीच्या दुष्परिणामांचा म्हणजेच साईड इफेक्टचा संभ्रम अद्यापही सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायम आहे. अनेकांच्या मनात लसीच्या साईड इफेक्टची भीती आहे. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी भारत सरकारने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. पण ‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेण्याआधी या दोन्ही लसींचे साईड इफेक्ट काय आहेत याबाबत लोकांना जाणून घ्यायचे आहे. ‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर काय परिणाम दिसून येतात हे अनेकांना जाणून घ्याचे आहे. त्याचसंदर्भात कंपन्यांनी तसेच सरकारने लस कोणी घ्यावी किंवा कोणी घेऊ नये याबद्दलची माहिती दिली आहे.

‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ दोन्ही लसी या सुरक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे. पण या दोन्ही लसींचे काही सर्वसामान्य साईड इफेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे. आपल्या अधिकृत वेबसाईटवर या दोन्ही कंपन्यांनी लस घेतल्यानंतर काय साईड इफेक्ट दिसून येतात यासंदर्भातील फॅक्ट शीट म्हणजेच माहितीपत्रक शेअर केले आहे.

कोणी घेऊ नये ‘कोव्हॅक्सिन’ ?

  • ‘कोव्हॅक्सिन’ ज्या लोकांना एलर्जी, ताप, रक्ताशी संबंधित आजार असणाऱ्यांनी किंवा रक्तची घनता कमी (पातळ रक्त) असणाऱ्यांनी घेऊ नये.
  • ही लस रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव टाकणारी कोणतीही औषधे सुरु असणाऱ्या व्यक्तींनी घेऊ नये.
  • त्याचबरोबर गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनी किंवा नुकतीच इतर कोणतीही लस घेतलेल्या माहिलेने किंवा कोणत्याही व्यक्तीने ही लस घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
  • लसीकरण केंद्रावर ज्यांच्या देखरेखीखाली लसीकरण केले जात आहे त्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीनंतर त्यांनी लस घेऊ नये, असे सांगितल्यावर लस घेणे टाळावे.

    काय आहेत ‘कोव्हॅक्सिन’चे साइड इफेक्ट ?

  • ‘कोव्हॅक्सिन’चे सौम्य साइड इफेक्ट दिसून येतात. यामध्ये लसीचे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, लाल रंगाचा डाग पडणे, लस ज्याठिकाणी घेतली आहे ते ठिकाण ठणकणे, इंजेक्शन लावण्यात आलेला हात अशक्त होणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • गंभीर प्रकारचे दुष्परिणाम लस घेतल्याने एखाद्या व्यक्तीवर दिसून येण्याची शक्यता कमी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गंभीर परिणामांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, चेहरा सुजणे, हृदयाची धडधड वाढणे, अंगदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात.

कोणी घेऊ नये ‘कोव्हिशिल्ड’ ?

  • ज्या व्यक्तींना कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थामुळे किंवा लसीमुळे एलर्जीचा गंभीर (एनाफिलेक्सिसचा) त्रास होतो त्यांनी लस घेऊ नये, असे सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने शेअर केलेल्या फॅक्टशीटमध्ये म्हटले आहे.
  • ज्यांना वारंवार ताप येते किंवा ज्यांच्या रक्तामध्ये ताप उतरलेला असतो किंवा रक्त पातळ असण्याची समस्या असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लस घेणे टाळावे.
  • इम्यूनोकॉम्प्रमाइज लोकांनी म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होणारी औषधे घेणाऱ्यांनाही ‘कोव्हिशिल्ड’ घेऊ नये.
  • जी महिला गरोदर आहे किंवा गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहेत त्यांची लस घेऊ नये.
  • गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनी ‘कोव्हिशिल्ड’चा डोस घेऊ नये
  • ज्या लोकांनी आधीच कोरोनाची दुसरी लस घेतली आहे त्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ घेऊ नये
  • ‘कोव्हिशिल्ड’च्या पहिल्या डोसमुळे ज्या व्यक्तींना एलर्जीचा त्रास झाला होता, त्यांनी पुढचा डोस घेऊ नये. यासंदर्भातील माहिती केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांना द्यावी

‘कोव्हिशिल्ड’चे साइड इफेक्ट काय आहेत?

  • अंगदुखी, ताप, लस घेतलेल्या ठिकाणी सुजणे, खाज येणे, त्वचा लाल पडणे या लक्षणांचा ‘कोव्हिशिल्ड’च्या सर्वसामान्य साइड इफेक्ट्समध्ये समावेश आहे.
  • सामान्यपणे लस घेणाऱ्यांना अशक्तपणा, थकवा जाणवतो. थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी, आजारी असल्यासारखे वाटणे, सांधेदुखी किंवा स्नायू दुखणे यासारखा त्रास होऊ शकतो.
  • इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी गाठ आल्याप्रमाणे सूजणे, ताप, उलट्या, फ्लूसारखी लक्षणंही काहीजणांना दिसू शकतात.
  • फ्लू सारख्या लक्षणांमध्ये ताप येणे, घशात खवखवणे, वाहते नाक, खोकला, थंडी यासारखी लक्षणे जाणवतात.
  • अगदीच गंभीर साइड इफेक्टमध्ये चक्कर येणे, कमी भूम लागणे, पोटात दुखणे, जास्त घाम येणे, सतत खाज येणे अशी लक्षणं दिसतात.

साइड इफेक्ट दिसल्यास काय कराल – ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रव्हेंन्शन’ने दिलेल्या माहितीनुसार जर अंगदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर संबंधित व्यक्तीने त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ओव्हर द काऊण्टर औषधे घेण्यासंदर्भात म्हणजेच इबुप्रोफेन, अ‍ॅस्पिरिन, अ‍ॅण्टीथिस्टेमाइस किंवा एसिटामिनोफेनसारख्या कोणत्याही पेन किलर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही या गोळ्या घ्याव्यात की नाही याबद्दलचा निर्णय घेऊ शकता. लस घेण्याआधीच अशाप्रकारच्या गोळ्या घेऊ नये. कारण यामुळे गंभीर स्वरुपाचे साइड इफेक्ट होऊ शकतात.