मुंबई – आयकर विभागाने आज सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्याने चर्चेत असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात धाडसत्र सुरू केली. अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी बरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे.
अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे
बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे मारले. या धाडी ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. हे छापे कर चुकवल्याच्या आरोपाखाली टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.
हे छापे ‘फँटम फिल्म’ आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर टाकण्यात आले. ही कारवाई त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही आयकर विभागाने म्हटले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. ही कंपनी २०११मध्ये अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.