अश्लील व्हिडीओप्रकरणी कर्नाटकच्या जलसंवर्धन मंत्र्यांचा राजीनामा!


बंगळुरु – महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये गंभीर आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यापैकी संजय राठोड यांनी बऱ्याच वादानंतर वनमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला असून त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच आता गंभीर आरोप कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यावर देखील झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना त्यांनी तातडीने राजीनामा दिला असून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, आपण राजीनामा नैतिकतेच्या पातळीवर देत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात मांडली आहे.

दाक्षिणात्य माध्यमांमध्ये एक अश्लील व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये अज्ञात महिलेसोबत रमेश जारकीहोलीच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर जारकीहोली यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दिनेश कालाहल्ली नामक व्यक्तीने या प्रकरणी बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेचे नोकरी देण्याच्या नावाखाली जारकीहोली शोषण करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांसोबत जारकीहोली यांच्या राजीनाम्याविषयी निर्णय घेण्यासाठी बैठक देखील घेतल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जारकीहोली यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कथित सेक्स टेप प्रकरणात आरोप झाल्यानंतर रमेश जारकीहोली यांनी राजीनामा दिला आहे. जारकीहोली मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. कर्नाटक सरकारमध्ये जारकीहोली यांचा चांगलाच दबदबा आहे. जारकीहोली यांची कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यात भूमिका महत्त्वाची होती. यावेळी काँग्रेसचे १७ आमदार फुटल्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले होते आणि येडियुरप्पा पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.