परिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’चे पहिले पोस्टर रिलीज


सध्या आपल्या आगामी ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. परिणीतीने या पाठोपाठ तिच्या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे.

बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून परिणीती चोप्रा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परिणीतीने नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘सायना’ असे असून हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर परिणीती चोप्राने चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. याआधी या भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आले होते. मात्र कालांतराने काही कारणास्तव श्रद्धाऐवजी परिणीतीची निवड करण्यात आली.


परिणीती या भूमिकेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीने सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले होते. यात तिने सकाळी 5 वाजताच ती दिवसाची सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. वर्कआउट करुन सकाळी 6 वाजताच ती सराव सुरु करत होती.

परिणीतीने एका फोटोत सायना नेहवालला टॅग केले असून या फोटोला आधी आणि नंतर.. तू हे कसे करतेस? असे कॅप्शन परिणीतीने दिले होते. तिने यात दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोत ती बॅटमिंटन खेळताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत दमल्यानंतर जमिनीवर ती झोपून गेल्याचे दिसत आहे.

परिणीतीचा या चित्रपटातील लूक आधीच समोर आला आहे. सायना नेहवालने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परिणीतीचा लूक शेअर केला होता. या फोटोला सायनाने ‘माझ्या सारखीच दिसणारी’ असे कॅप्शन दिले होते. 2012 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावले आहे. तसेच आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली. अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.