मुंबई महानगर क्षेत्रातील काही स्टेशनवरील प्लॅटफार्मच्या तिकीटांमध्ये पाचपटीने वाढ


मुंबई – रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील काही स्टेशनवरील प्लॅटफार्मच्या तिकीटांमध्ये भरमसाट म्हणजे पाचपट वाढ केली आहे. हा निर्णय २४ फेब्रवारी रोजी घेण्यात आला असून, हा निर्णय १५ जूनपर्यंत लागू असणार आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी या स्थानकांसह काही निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागणार असल्यामुळे या स्टेशनवर जाण्याआधी खिशाचा विचार करण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या रेल्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोरोनाचा धोका उन्हाळ्यात असल्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला असून, १५ जूनपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी रोड स्टेशन या स्थानकांचं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. या स्टेशनवर पूर्वी १० रुपये नहोते. या रेल्वे स्टेशनवर नेहमी गर्दी असते. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नसल्यामुळे गर्दी होणाऱ्या या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले.