टीआरपी प्रकरणी उच्च न्यायालयाकडून पार्थ दासगुप्ता यांना दिलासा


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आज ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांचा जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर त्यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.

बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. टीआरपी घोटाळ्याचे दासगुप्ता सूत्रधार असल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रातून केला होता. दासगुप्ता यांनी या प्रकरणी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पार्थ दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन लाखांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिले. त्याचबरोबर दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.