चित्र वाघ यांचे अमोल मिटकरींच्या टीकेला उत्तर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू असून अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झाला आहेस चांगले काम कर. बाकी माझे आणि साहेबांचे नाते काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा, असे म्हटले आहे.

आयपीसी सेक्शन 67 अंतर्गत बीकेसी येथील सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन चित्रा वाघ यांनी आज गुन्हा दाखल केला. चित्रा वाघ यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती की, आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये. याला चित्रा वाघ यांनी आज जोरदार प्रतिउत्तर दिले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांचे काही मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. शिवाय धमक्या देणारे फोन देखील आले होते. त्यांनी याविरोधात आज गुन्हा दाखल केला. चित्रा वाघ या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाल्या की, आज सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाईला काय केल्यावर ती शांत बसेल तर तिचे खासगी फोटो, पतीसोबतचे फोटो व्हायरल करायचे. हे कशासाठी तर बलात्काऱ्याला वाचवायला? संजय राठोडशी याचा थेट संबंध आहे म्हणून त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही लढाई लढत आहोत. राजीनामा ही तर खरी सुरुवात आहे पूजाच्या न्यायासाठी. माझ्यासोबत जे केले हे तर ट्रेलर आहे. मला याचा काही फरक पडत नाही. जिजाऊंनी शिकवण दिलेली विसरलात म्हणून घरावर हल्ला करता.

दरम्यान सचिन सावंत म्हणाले होते की, फडणवीस सरकारनेच किशोर वाघ यांच्याविरोधात कारवाई केली होती. वाघ या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, आमच्याकडे केस स्टँड आहे. आमच्या शेजारीच मुख्य आरोपी राहतो. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. त्याचा तपास देखील होत नाही. माझा नवरा तिथे पैसे घ्यायला होता का? त्याचे नाव पंचनाम्यामध्ये देखील नाही. तरीदेखील माझ्या नवऱ्यावर का गुन्हा दाखल केला हा साधा प्रश्न आहे? 2011 पासून एसीबीकडे केसेस पेंडिंग आहेत. याची दखल त्यांना घेऊ वाटत नाही, परंतु चित्रा वाघच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल होतो. पण मुख्य आरोपीवर नाही.

गृहमंत्री, एसीबीचे डिजी यांनी उमला त्तर द्यावे मुख्य आरोपीवर काय कारवाई केली? गुन्ह्यांना मी घाबरत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. यानंतर चित्रा वाघ यांना तुमच्या विरोधात आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांविरोधात वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात बंजारा समाज आणि पूजा चव्हाणची बदनामी केल्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, माझ्याकडे शेकडो मेसेज आहेत. ज्यामध्ये बंजारा समाजातील अनेकांनी पाठिंबा दिल्याचे देखील मेसेज आहेत. माझ्यासोबत विविध संघटना सोबत आहेत. राजीनामा झाला म्हणजे लढाई जिंकलो नाही, तर ही सुरुवात आहे. पूजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत राहणार नाही. एक माणूस म्हणजे समाज नव्हे.