मुंबईत दाखल असलेल्या याचिका शिमला न्यायालयात वर्ग करण्यात याव्या यासाठी कंगणाची सर्वोच्च न्यायालयात धाव!


अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आणि वादात राहिली आहे. विशेषत: तिने मुंबईत शिवसेनेला केलेल्या उघड विरोधामुळे ती महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात देखील चर्चेत आली. कंगनाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही सेलिब्रिटी मंडळींविरोधात केलेले काही ट्विट्स तिच्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण करणारे ठरले असून तिच्याविरोधात यासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. पण, आता कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी या याचिकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

कंगनाने एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जावेद अख्तर यांनी ह्रतिक रोशन प्रकरणासंदर्भात रोशन कुटुंबीयांसोबत वाद ओढवून घेतलास, तर ते तुला जेलमध्ये टाकतील, अशा शब्दांत आपल्यावर दबाव टाकल्याचे कंगना म्हणाली होती. पण जावेद अख्तर यांनी हा आरोप फेटाळून लावत कंगनावरच मानहानीची तक्रार दाखल केली होती. याबाबत कंगनाविरोधात अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत कंगनाने केलेल्या ट्विटसंदर्भात देखील तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या न्यायालयांमध्ये आपल्याविरोधात दाखल असलेले सर्व खटले मुंबईहून शिमला न्यायालयात वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेमध्ये मुंबईत शिवसेनेकडून आपल्याला धोका असल्यामुळेच आपण ही मागणी करत असल्याचे कंगनाने नमूद केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. कंगनाने शिवसेनेच्या भितीमुळेच सर्व खटले शिमला न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केल्याचे कंगनाने आपल्या याचिकेमध्ये नमूद केले आहे.