लस घेतानाचा फोटो काढण्यासाठी मास्क न घातल्यामुळे मोदींवर संतापले नेटकरी


नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाचा आजपासून देशामध्ये तिसरा टप्पा सुरु झाला असून आज सकाळी सात वाजताच दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीची पहिला डोस घेतला. लस घेतानाचा फोटो मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मोदींसोबत दोन नर्सही या फोटोमध्ये दिसत आहेत. मोदी लस घेताना हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. पण मोदींच्या चेहऱ्यावर लस घेताना मास्क नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली त्यांनी मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केला आहे.

ट्विटरला मोदींनी फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाचा पहिला डोस एम्स रुग्णालयात घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, लसीकरणासाठी जे जे लोक पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी असे, मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला कोरोनामुक्त करुया, असेही या ट्विटमध्ये मोदी म्हणाले आहेत.

अनेकांनी मोदींनी पोस्ट केलेल्या या फोटोखाली पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता, असे म्हटले आहे. तर मोदींनी फोटोसाठी मास्क काढल्याची टीका काहींनी केली आहे.