अमेरिकन कंपनीचा खळबळजनक दावा; यामुळे चीननेच केली होती मुंबईची बत्तीगुल


मुंबई – मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईमधील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दशकांमधील सर्वात मोठा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेची थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष भारताने करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच हा सायबर हल्ला चीनने केला. ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी केला जातो याच भारत चीन संघर्षाच्या काळात त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने मालवेअर इंजेक्ट केला. विशेष म्हणजे द न्यूयॉर्क टाइम्सने हा दावा आता केला असला तरी यापूर्वीही चीनी हॅकर्सचा मुंबईला काळोखात लोटण्यात हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

इंडिया टुडेने नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेल्या वृत्तामध्ये मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने व्यक्त केली होती. हा वीजपुरवठा ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबईतील अनेक भागांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक तास वीज नव्हती. सकाळी दहा वाजल्यापासून पुढील अनेक तास अनेक ठिकाणी वीजपुरठवा सुरळीत झाला नव्हता. काही ठिकाणी तर बारा तास उलटल्यानंतरही वीज नव्हती. हा वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेच्या लोकसेवेपासून इतर अनेक सेवांना मोठा फटका बसला होता.

याबाबत द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अ‍ॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी होऊनही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवणारा प्रकार घडला. पण कोड रिस्ट्रीक्शन या मालवेअर ट्रेसिंगमध्ये असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात या कंपनीने माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

मुंबई काळोखात चीनी सरकार पुरस्कृत रेडइको नावाच्या कंपनीने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी असणाऱ्या स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडइको कंपनीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली.

या सायबर हल्ल्यातील नोंदींचाही उल्लेख रेकॉर्डेड फ्युचरने प्रकाशित केलेल्या ब्लॉगमध्ये कंपनीने केला आहे. रेकॉर्डेड फ्युचरच्या इनस्कीट ग्रुपला २०२० च्या सुरुवातीपासून भारतीय संस्थांशीसंबंधित यंत्रणांमध्ये चिनी सरकारचा पाठिंबा असणाऱ्या कंपन्यांकडून घुसखोरी होत असल्याचे संकेत मिळत होते. कंपनीला २०२० च्या मध्यामध्ये भारतातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करणारे काही मालवेअर सापडले. वीजपुरठ्यातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱ्या यंत्रणांवर हल्ला करुन १० ठिकाणचे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय भारतामधील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही हल्ला करण्यात आल्याचे दिसून आले, असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. आम्ही भविष्यातही रेडइकोच्या हालचालींवर लक्ष ठेवणार असल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने म्हटले आहे.