मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम होणारच, तुम्हाला हवी ती कारवाई करा – मनसे


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अर्थात २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी तसा इशाराच दिला आहे. मराठी भाषा दिन पाळण्यासाठी देखील जर सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार. उद्याचा कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची ती करा, असे जाहीर आव्हानच अमेय खोपकर यांनी दिले आहे.

कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी मनसेकडून या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातात. खुद्द राज ठाकरेंनी या वर्षी जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चे आवाहन केले होते.

राज ठाकरेंच्या सहीनिशी हे पत्र मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आले आहे. यामध्ये ‘मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली, तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते, ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांत फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.