पेट्रोलियम मंत्री म्हणतात; पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच


नवी दिल्ली – एकीकडे सर्वसामान्य जनता इंधनाच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असताना या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला विरोधकांनीही घेरले आहे. दरम्यान हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी इंधनाचे दर हिवाळ्यात मागणीत वाढ होत असल्यामुळे वाढत असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. इंधनाचे दर हिवाळा गेल्यानंतर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असते, दर कमी होतील, असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९० रुपये ९३ पैसे तर डिझेलचा दर ८१ रुपये ३१ पैसे एवढा झाला आहे. तर मुंबईत हा पेट्रोलचा दर ९७ रुपये ३४ पैसे आणि डिझेलचा दर ८८ रुपये ४४ पैशांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एक भाष्य केले. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नसल्याचे सीतारामन यांनी म्हटले. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, मला सांगता येणार नाही कधी, हे धर्मसंकट असल्याचे उत्तर दिले.

केवळ उपकर यावर आकारला जातो असे नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो, ही काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारले तरी यात महसूल मिळत असल्याचे ते सांगतील, असेही निर्मला यांनी म्हटले. इंधन दरवाढीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

सौदी अरेबियाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात तेलाचे उत्पादन दररोज १ दशलक्ष बॅरेलने कमी करण्याचा निर्णय पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना (ओपेक) आणि रशियासह त्यांचे सहयोगी देश मिळून होणारा ‘ओपेक प्लस’ हा गट यांच्यात झालेल्या करारानुसार घेतला आहे. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती तेव्हापासून सतत वाढत आहेत. यामुळे तेलाच्या किमती बॅरलमागे ६३ अमेरिकी डॉलरपर्यंत चढल्या असल्यामुळेच इंधनाचे दर भडकले आहेत.