…अन्यथा आम्हाला आत्महत्याच करावी लागेल, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा!


बीड – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. त्यांच्यासोबत पूजाचे संबंध होते, असे देखील म्हटले जात आहे. आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. पूजाची सध्या चाललेली बदनामी थांबली नाही, तर मला कुटुंबासोबत आत्महत्याच करावी लागेल, अशा शब्दांत पूजाच्या वडिलांनी आपल्या तीव्र भावना एबीपीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच, पूजाच्या संपूर्ण कुटुंबाने ही बदनामी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली आहे.

कसेतरी सध्या आम्ही सावरत आहोत. एकेक दिवस मागे टाकत आहोत. तेवढ्यात नवीन काहीतरी टीव्हीवर दाखवतात. नवीन फोटो जुळवतात. माझी मुलगी राजकीय कार्यकर्ती होती, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांचे काम करत होती. तिचे कितीतरी फोटो आहेत. मग एकाच व्यक्तीसोबत का फोटो दाखवले जातात? पुरावे नसताना फक्त फोटो जोडून बदनामी केली जात आहे. तिला न्याय मिळायलाच हवा. माझी एक मुलगी गेली. पण हे दाखवत आहेत, ते पाहून माझ्या दुसऱ्या मुलीशी कोण लग्न करेल? माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर मुलीसोबत न्यायालयासमोर जाऊन आत्महत्या करायची किंवा या सगळ्यांबद्दल न्यायालयात केस दाखल करायची, असे पूजा चव्हाणचे वडील म्हणाले.

दरम्यान, पूजाच्या लहान बहिणीने देखील या मुद्द्यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आई-वडिलांना या बदनामीमुळे काही झाले, तर तुम्ही माझे पालन-पोषण करणार आहात का? माझी जबाबदारी तुम्ही घेणार का? असा सवाल पूजाची बहीण दियाने केला आहे. ११वीपासून पूजा राजकारणात आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासोबत तिने काढलेले फोटो व्हायरल का होत नाहीत? त्या पुरूष नाहीत म्हणून का? असाही प्रश्न दियाने विचारला आहे.