मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे नागपूर कनेक्शन


मुंबई – स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ ही कार रोडवर उभी करण्यात आली होती. जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या गाडीत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या स्फोटकांचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे.

नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांड्या तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी सोलर एक्स्प्लोझिव्ह ही कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटके प्रामुख्याने पुरविली जातात. यासंबंधी माहितीची सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी दिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्हमध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.

यासंदर्भात रिपब्लिकने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचने हाती घेतला असून १० पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही एक टीम तपासणार आहे. तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयातील कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे. एक टीम क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपासणार आहे. चौथी टीम आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवणार आहे. तर एक टीम संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे.

दरम्यान एका टीमवर इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली आहे. २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारे एक पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने पाठवले होते. इतर दोन टीम आतापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहे. याशिवाय पोलीस बीएमसी पार्किंगमधील फुटेजची तपासणी करत आहे. येथे आदल्या रात्री एक मसिर्डीज संशयास्पदपणे पार्क करण्यात आली होती. पार्किंगची जबाबदारी असणाऱ्याची पोलीस चौकशी करत आहेत.