लंडन न्यायालयाची फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी


लंडन – पीएनबी घोटाळ्यातील फरार हीरा व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात लंडनच्या न्यायालयात गुरुवारी अखेरची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान नीरवला भारताकडे सुपूर्द करण्याची न्यायालयाने मंजुरी दिली आहे. लंडनमध्ये व्हर्चुअल हिअरिंगनंतर न्यायाधीश सॅमुअल गूजीने म्हटले की, भारतात सुरू असलेल्या खटल्यात नीरव मोदीला उत्तर द्यावे लागेल. त्यांनी मान्य केले की, पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना घाबरवण्याचा नीरव मोदीने प्रयत्न केला.

न्यायाधीश पुढे म्हणाले की, भारतात नीरव मोदीला पाठवले जाणार म्हणजे, तिथे त्यांना न्याय मिळणार नाही, असे नाही. त्याचबरोबर नीरव मोदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याच्या युक्तिवादाचेही न्यायालयाने खंडन केले. मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील बॅरक नंबर-12 नीरवसाठी फिट असल्याचे न्यायालयाने म्हटले.

पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये बंद आहे. भारताकडे त्याचे प्रत्यार्पण करण्याचे प्रकरण सुरू होते. न्यायालयाच्या निकालानंतर ही बाब अंतिम मंजुरीसाठी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे जाईल.

नीरवच्या वकीलांनी सुनावणीदरम्यान दावा केला की, नीरव मानसिक आजारी आहे. यासोबतच नीरवला भारतातील तुरुंगात योग्य व्यवस्था मिळणार नसल्याचेही म्हटले. भारतीय एजंसीकडून क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस प्रकरणात युक्तीवाद मांडत आहे. सीपीएसच्या बॅरिस्टर हेलन मॅल्कम म्हटल्या होत्या की, प्रकरण एकदम स्पष्ट आहे. नीरवने तीन पार्टनर असलेल्या आपल्या कंपनीमधून अब्जो रुपयांचा बँक घोटाळा केला.