जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींची केली हिटलरसोबत तुलना


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला दिल्यानंतर त्यावरुन आता राजकारण तापायला सुरूवात झाली असून भाजप आणि पंतप्रधान मोदींना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर ‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण केल्याने जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी यावेळी थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असे ट्विट करत मोदींचे नाव न घेता आव्हाड यांनी त्यांची तुलना हिटलरसोबत केली आहे.


दुसरीकडे, गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावाने मते मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. सरदार पटेल यांचा अपमान गुजराजची जनता सहन करणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेलांनी प्रतिबंध घातले होते म्हणून त्यांचे नाव हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका केली आहे. तर, नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडियमला आपले नाव दिल्याची खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केली आहे.