आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर रिलीज


‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली. या चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही तासातच रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता या चित्रपटाच्या टीझरमुळे शिगेला पोहचली आहे. हा चित्रपट येत्या 30 जुलैला रिलीज होणार आहे.

आलियाचा कधीही न पाहिलेला अंदाज या चित्रपटाच्या टीझरमध्ये समोर आला आहे. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचे टीझरमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात कामाठीपुरा येथील वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास पाहायला मिळणार आहे.


दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटातून मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संयज लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्तानं टीझर रिलीज करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर टीझर शेअर करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना आलिया भट्टने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मला वाटते तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा याहून वेगळा मार्ग असूच शकत नाही. माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक भाग मी तुमच्या समोर सादर करत आहे… भेटा गंगूला!” असे कॅप्शन देत आलियाने संजय लीला भन्साळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.