इन्स्टाग्राम स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या


पुणे – रविवारी सायंकाळी पुण्यातील राहत्या घरामध्ये गळफास लावून मराठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समीर गायकवाड या २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. समीर हा इन्स्टाग्रामवर एका नावाजलेला चेहरा होता. तो मागील महिन्याभरामध्ये इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. अल्पवधीतच समीरने व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणाईला आवडणाऱ्या स्टाइलमध्ये वैचारिक संदेश देण्याच्या कलेमुळे अफाट लोकप्रियता मिळवली होती. समीरच्या मृत्यूसंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर इन्सटाग्रामवरील त्याच्या चाह्त्यांना या बातमीवर विश्वासच बसत नाही.

वाघोली येथील केसनंद रोडवरील निकासा सोसायटीमधील आपल्या राहत्या घरात समीर गायकवाडने गळफास घेतला. साडीच्या सहाय्याने घरातील आपल्या रुममधील पंख्याला फास लावून समीरने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्थानकाला समीरचा भाऊ प्रफुल्लने कळवली. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेले. पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोणतीही सुसाईड नोट समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता समीरच्या भावाची आणि जवळच्या नातेवाईकांची या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भातील काही माहिती समोर येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समीरने खास व्हिडीओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्याने आत्महत्येच्या दिवशीही सकाळी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याच्या वृत्तावर अनेकांचा विश्वास बसत नाही. इतरांना प्रेरणादायी संदेश देणाऱ्या, अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या सामीरला आत्महत्या करावीशी का वाटली असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहे.

मागील काही काळापासून इन्टाग्रामवरील व्हिडीओंमुळे पुण्यातील वाडिया कॉलेमध्ये शिकणारा समीर प्रचंड लोकप्रिय झाला होता. समीर त्याच्या रुबाबदार, भारदस्त आवाजाबरोबरच लूक्स आणि व्हिडीओमधील संदेशांमुळे लोकप्रिय झालेला. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.