आयसीसीची मंगळ ग्रहावर क्रिकेट खेळवण्याची तयारी अन् नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया


वॉशिंग्टन – १२ फेब्रवारी रोजी मंगळावर अमेरिकन अंतराळ संशोधन संख्या म्हणजेच नासाच्या ‘पर्सिव्हिअरन्स’ने यशस्वीरित्या लॅण्डिंग केले. बग्गीसारखी एक गाडी या मोहिमेमध्ये मंगळावर उतरवण्यात आली असून ही गाडी सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम करणार आहे. नासाच्या या लॅण्डिंगला यश आल्यानंतर जगभरातील वेगवेगळ्या संस्थांकडून नासाचे कौतुक केले जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने याच कौतुक सोहळ्यामध्ये अगदी हटके ट्विट करत या लॅण्डिंगचा संबंध क्रिकेटशी जोडला असून या ट्विटवर क्रिकेटचाहत्यांनाही मजेदार कमेंट दिल्या आहेत.


आयसीसीने ‘पर्सिव्हिअरन्स’च्या मार्स लॅण्डिंगचा काल्पनिक फोटो ट्विट करत या मोहिमेच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. पण स्टम्प रोवलेले क्रिकेटचे पीचही या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये, “क्रिकेट हे आऊट ऑफ दिस वर्ल्ड आहे, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आल्याचे आयसीसीने म्हटले आहे. आऊट ऑफ दिस वर्ल्ड या शब्द इंग्रजीमध्ये काहीतरी जगावेगळे केले असेल तर त्यासाठी कौतुकास्पद किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट असल्याचे सांगण्यासाठी वापरला जातो. हा शब्द येथे आयसीसीने अर्थाच्या दृष्टीने आणि शाब्दिक अर्थ अशा दोन्ही पद्धतीने वापरला आहे. मंगळावर नासाने ‘पर्सिव्हिअरन्स’ उतरवण्याचे जे काम केले आहे ते भन्नाट आहे तसेच शब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर ते जगात म्हणजेच पृथ्वीवर कुठेच करता येणार नाही असे काम असल्याचे म्हटले आहे. तसेच नासाचे हे यश म्हणजे सामन्याआधी नाणेफेक जिंकण्यासारखे असून पुढे काय नासा काय करणार असा प्रश्नही या ट्विटमध्ये आयसीसीने नासाला टॅग करुन विचारला आहे. या ट्विटमध्ये वीन द टॉस अॅण्ड… असे वाक्य आहे.