भारत जागतिक स्तरावर कोरोनाविरोधातील लढाईत करत आहे नेतृत्व – संयुक्त राष्ट्र


नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच इतर देशांना कोरोना लसींचे लाखो डोस पुरवणाऱ्या भारताचे कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदुतांसाठी लसपुरवठा करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. भारताच्या या निर्णयाचे संयुक्त राष्ट्राने स्वागत केले असून भारत हा कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये जागतिक स्तरावर नेतृत्व करत असल्याचे सांगत भारताला ग्लोबल लीडर असल्याचे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या सचिव असणाऱ्या टी. एस. तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. भारत कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये ग्लोबल लीडर म्हणून काम करत आहे. कोव्हॅक्स सेवेला बळकटी देण्यासाठी भारत जगभरातील वेगवेगळ्या देशांना लसीचा पुरवठा करत आहे. जगभरात लसी पुरवणाऱ्या भारताचे आम्ही आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

कोरोना लसींसंदर्भात जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी आम्ही कायमच तयार असल्याचे केंद्रातील मोदी सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आतापर्यंत भारताने ५० हून अधिक देशांना कोरोना लसींचा पुरवठा केल्यामुळेच मोदी सरकारच्या या प्रयत्नांची दखल घेत भारताला ‘ग्लोबल लीडर इन वॉर अगेन्सट कोरोना’ असल्याचे म्हणत संयुक्त राष्ट्राने शाबासकी दिली आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचेही गुट्रेस यांनी आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने मागील आठवड्यापर्यंत एकूण २२९.७ लाख लसी निर्यात केल्या आहेत. भारतामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये पहिल्या दिवशीच २० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्याचबरोबर भारताने संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या हजारो व्यक्तींचेही लसीकरण केले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणासंदर्भातील कोव्हिन नावचे अ‍ॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आले आहे. हे अ‍ॅप लसीकरणासंदर्भातील संपूर्ण माहिती आणि त्याबद्दलचे आकडेवारी जमा करण्याच्या हेतूने लॉन्च करण्यात आले आहे.

सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या वापराला भारताने परवानगी दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आठवड्याची आकडेवारी देताना भारताने ओणान, निकारागुआसोबतच अनेक देशांमध्ये लवकरच कोरोना लसीचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले. लवकरच आफ्रिकेमधील देशांसाठी एक कोटी डोस भारत पाठवणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख डोस केवळ संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पाठवण्यात येतील, असेही भारताने स्पष्ट केले आहे. आपल्या नागरिकांना कोरोना लस तातडीने देणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर भारत कोरोना लसीकरणाच्या बाबततीत खरोखरच नेतृत्व करत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.