आर्चीच्या कार्यक्रमात सैराट झालेल्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल


आर्चीचे अर्थात रिंकू राजगुरुची एन्ट्री म्हटली की उपस्थित सैराट होणार हे नक्कीच झाले आहे. पण हाच प्रकार कोरोनाच्या काळात सहा जणांना महागात पडला आहे. आर्ची-परश्याची जोडी लोकांनी सैराट चित्रपटानंतर डोक्यावर उचलून घेतली. ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे आजही कळते तरी मोठी गर्दी जमा होते. पण चाहत्यांचे हे वेड कोरोनाला पूरक ठरू शकते, याचा विसर पडल्याचे दिसत आहे.

कोरोना नियमांचे पालन न केल्याने नांदेडमध्ये या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेंगी महोत्सव माहूर तालुक्यातील सारखणी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लेंगी महोत्सवाला सैराट फ्रेम आर्चीला म्हणजेच रिंकू राजगुरू हिला बोलावण्यात आले होते.

हा कार्यक्रम 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. आर्चीला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भादंवीच्या कलम 188, 269, 270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.