विना मास्क बुलेट सवारी करणाऱ्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल


अमरावती – कोरोनाबाधितांच्या संख्येत राज्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारने याच पार्श्वभूमीवर शिवजयंती पूर्वी राज्यात कडक निर्बंध लावले होते. याशिवाय मास्क न लावल्यास कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. पण याचदरम्यान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी शिजयंतीच्या दिवशी सगळे नियमांची पायमल्ली करत विना मास्क व विना हेल्मेट बुलेट सवारी केली. याच पार्श्वभूमीवर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा हे बुलेटवरुन जात असताना दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. याचा व्हिडीओ खुद्द रवी राणा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केला होता. जर अशाप्रकारे लोकप्रतिनिधीच स्वत: नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी जात असतील तर ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले जात आहे.

संपुर्ण राज्यात वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क जे लोक लावत नाहीत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली असताना शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाला जाताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही बुलेटवर गेले. पण त्यावेळी दोघांनीही मास्क आणि हेल्मेटचा वापर केला नव्हता. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना बंधनकारक असलेली नियमावली लोकप्रतिनिधींना नाही का?, असा प्रश्न विचारला जात आहे.