शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यामुळे त्यांची राष्ट्रवादीत होणार का घरवापसी याची धाकधुक?


मुंबई – भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे आणि मी एकच असल्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, पण गावांचा आणि तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू झाली असून, राष्ट्रवादीमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने सध्या साताऱ्यात जोर धरला आहे. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये येण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी यू-टर्न घेतल्याचीही चर्चा ही जिल्ह्यात आहे. शिवेंद्रसिंहराजे यांची सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईतील सरपंच परिषद या संघटना व जावळी तालुक्याच्या वतीने सरपंच व कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांचा मेढा (ता जावळी) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हे वक्तव्य केले. जावळी येथे शेतकरी मेळाव्यात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली होती. माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही, अशा शब्दांत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आव्हान दिले होते.

मला माझ्या मागे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस असल्याचेही शिवेंद्रसिंहराजे शशिकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले होते.

शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये जावळी तालुक्यातील राजकारणामुळे जुगलबंदी होत वाद विकोपाला गेले होते .यानंतर शशिकांत शिंदे यांनी माझ्यामध्ये व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आजही आम्ही एकत्र काम करत असल्याचे म्हटले होते. आम्ही सातारा जिल्हा बँकेची निवडणूक सर्वांना घेऊन बिनविरोध करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रसिंहराजे सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवेंद्रसिंहराजे आल्यास सातारा पालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. त्याच दिवशी रात्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा विश्रामगृहात खलबते झाली होती.

रामराजेंची शिवेंद्रसिंहराजेंनी शिवरूपराजेंसोबत भेट घेतल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि१७) मंत्रालयात शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मागील निवडणुकीनंतर कोण कुठे गेले आणि कोण कुठे गेले हे सर्वांना माहीत आहे, पण आम्ही दोघे आजही एकत्रच काम करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटल्यामुळेच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवेंद्रसिंहराजे यांची घरवापसी होणार अशी अटकळ बांधली जात आहे.