कोरोनाबाधितांची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत असून ते धोक्याचे आणि काळजीचे – अजित पवार


पुणे – राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असून राज्य सरकार अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी विचार करत आहे. डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणे चिंतेची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

रविवारी कोरोनावर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. कोरोनाला कसे रोखता येईल याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली त्यात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात पॉझिटिव्हची संख्या जे डिस्चार्ज व्हायचे त्यांच्यापेक्षा कमी होती. पण १ फेब्रुवारीपासून काही शहरे, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत असून ते धोक्याचे आणि काळजीचे असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

आमची कामकाज सल्लागार समितीची काल बैठक झाली. आम्ही १ मार्चपासून या बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशनचा कार्यक्रम आखला आहे. साधारण तीन चार आठवड्याचा कार्यक्रम दिला. पण गुरुवारी त्याबद्दल पुन्हा चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, काही बाबतीत तेथील प्रशासनाला गरज वाटत असेल तर लॉकडाउन करा अशी मुभा देण्यात आली आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असे करायचे असेल तर तसे करा…पण बाकीच्या टीमला कोणी मास्क वापरत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे सांगितले आहे. प्रशासनाने लोकांना पुन्हा एकदा याबद्दलचे गांभीर्य लक्षात आणून दिले पाहिजे.

मीडियालाही माझी विनंती आहे. गेल्यावेळी लाठीचार्ज झाला, तेव्हा वेगळ्या पद्धतीने बोलले गेले. पण त्याच्यातून लोकांना नियम पाळले पाहिजे, असे समजले होते. कोरोना काळात पोलिसांनी तर स्वत:ला झोकूनच दिले होते. डॉक्टर, नर्सेस यांनीदेखील अनेकांचे जीव वाचवल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना म्हणाले की, मी सौरभराव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ताच बोललो असून आपल्याला तातडीने बैठक घ्यावी लागेल, असे सांगितले. रविवारचा दिवस असला तरी सकाळी १० पासून आम्ही डॉक्टर साळुंखे, इतर अधिकारी त्यांच्याशी बोलून जे निर्णय घ्यावे लागतील त्यासंबंधी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ.