पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी छत्रपतींना येणाऱ्या भाषांचा दाखला देत अजित पवारांच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी नवीन भाषा शिकणार असल्याचे सांगताच हास्याचे कारंजे उडाले.
अजितदादांच्या मनात काय चालले आहे ती कळणारी भाषा शिकणार-उद्धव ठाकरे
शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींना अवगत असलेल्या भाषांचाही भाषणात उल्लेख केला. शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्याचबरोबर शिवसुमन हे फुल. हे फुल आधी बघितले नव्हते अशातील भाग नाही. पण, आज त्याचे वैशिष्ट्ये कळाले. शिवनेरी परिसरातच ते फुल पहिल्यांदा आढळून आले, हा शिवयोग आहे. ते ज्यांनी शोधले, त्याचे वेगळेपण ओळखले त्यांचे मी कौतूक करतो.
किती भाषा छत्रपती शिवाजी महाराजांना यायच्या याबद्दल आता बोलत असताना अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. अजितदादांना ही भाषा येते. पण, आता ती भाषा मी शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चालले आहे ते कळले पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चालले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.
काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवली की, बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. आम्ही सर्वजण त्या एका जिद्दीने एकत्र आलेलो आहोत. मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. राजे तुम्ही कितीही म्हणा राजकारण बाजूला ठेवा, पण तुमच्या आमच्या मनातील शिवप्रेम हा धागा आहे ना, महत्त्वाचा आहे. धागे अनेक असतात, पण गोफ विणणे महत्त्वाचे असते. हा गौफ राज्याच्या विकासाचा गौफ असणार आहे. मी अनेक किल्ले हेलिकॉप्टरमधून बघितले आहेत. पण आता हे जगापर्यंत पोहोचवायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.