आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असून, मागील २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यात एक-दोन दिवसांत काही प्रमाणात निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकाव राज्यात झाल्यापासून सातत्याने फिल्डवर असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.


माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना देखील दिवसभरात कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.