शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून शिवरायांना अभिवादन


मुंबई – छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमन केले आहे. छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ नरेंद्र मोदींनी शेअर केला आहे. दुसरे शिवाजी कोणी होऊ शकत नाही, पण सेवाजी मात्र होऊ शकतो, असे सांगत सेवेचे महत्व अधोरेखित केले आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.


शिवजयंतीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा, असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


राज्यातील आणि देशातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे, जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


देशवासियांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, मी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो. ते एक योद्धा, प्रतापी सेनानायक, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते. शिवाजी महाराजांनी नेहमी जनहित, राजहित आणि राष्ट्रहितासाठी काम केले आहे. त्यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी गौरव आणि प्रेरणेचा स्रोत आहे.


शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना आपल्या संदेशात खासदार संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली. सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषास त्रिवार मुजरा !!!


शिवजयंतीच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.


शिवजयंतीच्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना मनसे अधिकृतच्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या सिंहगडावरील भेटीसंबंधी घटना राज ठाकरेंच्या आवाजातील या व्हिडीओमध्ये सांगण्यात आली आहे.