४० वर्षीय अनुभवी हरभजनला मिळाला नाही खरेदीदार


चेन्नई – भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्यावर आयपीएलच्या लिलावात एकाही संघमालकाने बोली लावली नाही. दोन कोटी रुपये एवढी ४० वर्षीय हरजभन सिंग याची मूळ किंमत होती. वैयक्तिक कारणामुळे गतवर्षी हरभजन सिंग याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर भज्जीला चेन्नईने करारमुक्त केले होते.

मुंबई आणि चेन्नई अशा दोन संघाचे १३ वर्षांपासून आयपीएल खेळणाऱ्या हरभजन सिंग याने प्रतिनिधित्व केले आहे. संघात भज्जी असताना दोन्ही संघांनी चार वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरले आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा भज्जी आयपीएलच्या लिलावात उतरला होता. २००८ पासून २०१७ पर्यंत हरभजन सिंग याने मुंबईच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भज्जी मागील तीन वर्षांपासून धोनीच्या चेन्नईच्या संघात होता. सीएसकेने त्यावेळी दोन कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले होते. २०१९ मध्ये सीएसकेकडून खेळताना हरभजन सिंगने ११ सामन्यात १६ बळी घेतले होते.

सीएसकेसोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचे ४० वर्षीय हरभजन सिंगनं ट्विट करत सांगितले होते. सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!, असे भज्जी ट्विटमध्ये म्हणाला होता. १६० आयपीएल सामन्यात अनुभवी हरभजन सिंग याने १५० बळी घेण्याची किमया साधली आहे. १८ धावा देत ५ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.