चेन्नई – आयपीएलच्या लिलावात प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघाने शाहरुख खानला खरेदी केले आहे. हा कोणी अभिनेता नसून तो एक क्रिकेटपटू आहे. प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूच्या अष्टपैलू शाहरुख खानला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. पंजाब संघाने २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या युवा अष्टपैलू शाहरुख खानला पाच कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केले आहे.
पंजाब संघाने आयपीएलच्या लिलावात शाहरुख खानला केले खरेदी
आपल्या संघात तामिळनाडूचा युवा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानला घेण्यासाठी संघमालकांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. शाहरुख खानसाठी पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघानं मोठी बोली लावली. पण, ही बोली प्रितीच्या पंजाब संघाने जिंकली. तामिळनाडूचा शाहरुख खानच्या नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेतील कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पंजाब संघात के. एल राहुल, ख्रिस गेल आणि मयांक अगरवाल यांच्यासारख्या दिग्गजांसोबत शाहरुख आता आपले नशीब अजमाणार आहे.
देशांतर्गत टी-२० सामन्यात शाहरुख खानने दमदार प्रदर्शन करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३१ टी २० सामन्यात शाहरुख खान याने १३२ च्या स्ट्राईक रेटने २९३ धावा चोपल्या आहेत. आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.