पुणे – पुण्यातील कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून पुणे महानगरपालिकेने या पार्श्वभूमीवर पुण्यात केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. महापालिका कार्यालयातून या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पुण्यात केरळहून येणाऱ्यांना प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
पुणे शहरात केरळ राज्यातून येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांची ही चाचणी निगेटीव्ह आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याची परवानगी असेल, तर इतरांना प्रक्रियेनुसार अलगीकरणात अथवा विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल.
खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यात प्रवेश करतांना केरळमधील प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह अहवाल सादर करणे अनिवार्य केले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी आगमनाअगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल. १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध महापालिकेने वाढविले आहेत. या निर्बंधाशी संबंधित आदेश गुरुवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले.