लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; जप्त केल्या दोन तलवारी


नवी दिल्ली – आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. लाल किल्ल्यावर जाऊन एका गटाने पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. आणखी एका मुख्य आरोपीला लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. यापूर्वी अभिनेता दीप सिद्धू याला या घटनेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे महिंदर सिंग उर्फ मोनी असे नाव आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मोनी मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलीस हिंसाचाराच्या घटनेपासून त्याचा शोध घेत होते. दिल्लीतीलच स्वरूप नगर येथील ३० वर्षीय मोनी रहिवासी असून, त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. दिल्ली पोलिसांच्या व्हिडीओत महिंदर तलवारीसह हिंसाचारात सहभागी असल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी मोनीच्या घराची झाडाझडती घेतली असता यावेळी दोन तलवारी सापडल्या. तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून, पोलिसांकडून आरोपी महिंदर सिंगची चौकशी केली जात आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात अभिनेता दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर अचानक एक गट लाल किल्ल्याकडे गेला. त्यानंतर लाल किल्ल्यावर हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर उमटले. तसेच दीप सिद्धु लाल किल्ल्यावरील हिंसाचारामागे असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर इतर आरोपींचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शोध सुरू असतानाच पोलिसांनी महिंदर सिंगला अटक केली.